नगर परिषद निवडणुक प्रश्नावली

1. स्थानिक स्वराज्य संस्थेची संरचना व सदस्य संख्या

प्रश्न 1 नगर परिषदेची संरचना कशी असते ?

उत्तर:- प्रत्येक नगर परिषदेसाठी निवडणुकीच्या प्रयोजनासाठी नगरपालिकेचे क्षेत्र ज्या प्रभागात विभागले जाईल त्याची संख्या व सीमा शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येते. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी लगतच्या जनगणनेच्या प्रसिध्द आकडेवारीनुसार सदस्य संख्या ठरविण्यात येते.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10)

प्रश्न 2 नगरपालिकेमध्ये नियमानुसार कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ?

उत्तर:- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 9 अन्वये पालिका सदस्य संख्या निश्चित करण्याची तरतूद आहे. यात खालीलप्रमाणे सदस्य संख्या असते:-परिषदेचा वर्गनिवडून द्यावयाच्या परिषद सदस्यांची संख्या”अ” वर्गकिमान सदस्य संख्या – ३८ १,००,००० पेक्षा अधिक असलेल्या लोकसंख्येपैकी प्रत्येक ८,००० लोकसंख्येकरिता, एक जादा सदस्य देय असेल, तथापि, एकूण सदस्य संख्या ६५ हून अधिक नसते;”ब” वर्गकिमान सदस्य संख्या – 23 40,००० पेक्षा अधिक असलेल्या लोकसंख्येपैकी प्रत्येक 5,००० लोकसंख्येकरिता, एक जादा सदस्य देय असेल, तथापि, एकूण सदस्य संख्या 37 हून अधिक नसते;”क” वर्गकिमान सदस्य संख्या – 17 25,००० पेक्षा अधिक असलेल्या लोकसंख्येपैकी प्रत्येक 3,००० लोकसंख्येकरिता, एक जादा सदस्य देय असेल, तथापि, एकूण सदस्य संख्या 23 हून अधिक नसते;नगर पंचायतनगर पंचायतीकरिता एकूण १७ सदस्य देय होतात.

प्रश्न 3 नगर परिषदेकरिता सदस्य संख्या कोण व कशी निश्चित करतात ?

उत्तर:- नगर परिषदेकरिता सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त यांना आहेत. सदस्य संख्या लगतच्या जनगणनेच्या प्रसिध्द आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येते.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 9 (2) आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्र. नपसु- 2001/प्र.क्र.1/2001/5, दिनांक 01/01/2001)

प्रश्न 4 नगर परिषद क्षेत्रात विभागणी करण्यात आलेल्या मतदार संघांना काय म्हणतात ?

उत्तर:- नगर परिषद क्षेत्रात विभागणी करण्यात आलेल्या मतदार संघास प्रभाग अथवा वॉर्ड असे म्हणतात.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10 (1)

2. सदस्य संख्येचे निकष

प्रश्न १ निश्चित केलेली सदस्य संख्या किती कालावधीसाठी असते ?

उत्तर:- नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सभेसाठी नेमून दिलेल्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत असते. परंतु, नगर परिषदेच्या हद्दीत वाढ झाल्यास त्यात बदल होऊ शकतो.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 40 व 41)

प्रश्न २ सदस्य संख्या निश्चित केल्यानंतर त्यासंबंधीचे आदेश कसे प्रसिध्द केले जातात ?

उत्तर:- सदस्य संख्या निश्चितीचे आदेश शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येतात. (संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 9(2))

प्रश्न 3 राखीव जागेवरील सदस्यांची संख्या कशाच्या आधारे निश्चित करण्यात येते ?

उत्तर:- नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेले एकूण प्रभागातील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीकरिता जागा संबंधित नगर परिषदेच्या क्षेत्रातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या आधारे ठरविण्यात येते. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा राखीव होतात. महिलांकरिता एकूण सदस्य संख्येच्या ५०% जागा राखीव ठेवण्यात येतात.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 9(2)(c))

प्रश्न 4 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सदस्य संख्या कशा प्रकारे निश्चित करण्यात येते ?

उत्तर:- नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सदस्यांसाठी एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा (महिलांसह) निश्चित करण्यात येतात.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 9(2)(d))

प्रश्न 5 महिलांसाठी सदस्य संख्या कशा प्रकारे निश्चित करण्यात येते ?

उत्तर:- नगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांसाठी सदस्य संख्या ही एकूण निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येच्या ५०% जागा (राखीव जागेसह) निश्चित करण्यात येते.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 9(2)(b))

प्रश्न 6 नगर परिषद क्षेत्रामध्ये वाढ झाल्यास काय कार्यवाही करण्यात येते ?

उत्तर:- नगर परिषदेच्या क्षेत्रामध्येवाढ झाल्यास वाढ झालेल्या क्षेत्राकरिता लोकसंख्येच्या आधारे देय असलेले सदस्य देण्याकरिता पोटनिवडणूक घेण्यात येते.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10(5))

प्रश्न 7 वाढीव क्षेत्राच्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी किती असतो ?

उत्तर:- वाढीव क्षेत्राकरिताच्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याचा कालावधी नगर परिषदेच्या कालावधी एवढाच असतो.
( संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10(5))

 4,122 total views,  3 views today

Share This On :
error: